पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी या अहवालाचा नक्कीच उपयोग होईल - जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई :- गतवर्षी भीमा व कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी नक्कीच या अहवालाचा उपयोग होईल. असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री वडनेरे,अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव अतुल कपुले उपस्थित होते.
भीमा व कृष्णा खोऱ्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विश्लेषण करुन कारणे शोधणे, भविष्यात पुराची दाहकता कमी करणेस्तव तांत्रिक उपाययोजना,धोरणे सुचविणे, कर्नाटकातील अलमट्टी व इतर जलाशयांमुळे महाराष्ट्रात पूरपरिस्थिती (Back Water) निर्माण होते किंवा कसे, हे जलशास्त्रीय अभ्यासाद्वारे स्पष्ट करणे.या विषयक अभ्यासासाठी शासनाने नेमलेल्या तज्ञांच्या समितीने तब्बल २६ बैठका घेत पूरप्रवण भागांना भेटी देऊन तांत्रिक बाबींवर चर्चा करत विविध अंतर्गत अभ्यासगट नेमून सखोल अभ्यास करत हा विस्तृत अहवाल तयार केला आहे.
23 ऑगस्ट 2019 मध्ये शासनाने निवृत्त प्रधान सचिव (जलसंपदा) यांचे अध्यक्षतेखाली भारतीय हवामान खाते (IMD), भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था (IITM), केंद्रिय जल आयोग (CWC), महाराष्ट्र सुंदूर संवेदना उपयोगिता केंद्र (MRSAC), आय.आय.टी. (IIT), मुंबई मजनिप्रा (MWRRA) मधील तज्ञ, जलतज्ञ व जलसंपदा विभागातील सचिव यांची अभ्यास समिती गठित केली होती.