बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरात कोरोना वर उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभाग नसल्याने प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना ठाणे, मुंबईसारख्या शहरातील रुग्णालयात हलवावे लागत होते. मात्र आता बदलापुरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्येही कोविडच्या गंभीर आजारावर अतिदक्षता विभागात उपचार केले जाणार आहेत.
बदलापूर पालिकेने लक्षणे नसलेल्या परंतु कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीएसयुपी योजनेतील घरांमध्ये १०० बेडचे रुग्णालय उभारले आहे, तर अंबरनाथ नगरपालिकेने देखील ५०० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र अंबरनाथ तालुक्यातील या दोन्ही शहरातील जे कोरोनागस्त रुग्ण गंभीर झाले आहेत त्यांच्या योग्य उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभागाची कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यात देखील कोविड अतिदक्षता विभाग सुरू करण्याचे प्रयत्न तालुका प्रशासनाने सुरू केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बदलापूर ग्रामीण भागातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये कोविडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या रुग्णालयात २५ बेडचे दक्षता विभाग आणि २१ बेडचे अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले आहे. तर इतर कोरोना ग्रस्तांवर उपचार करण्यासाठी ४० बेड स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत. यासोबत रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पंधरा दिवसातच बेडची संख्या ६० वरून १५० वर करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त दोनशे बेडचे रुग्णालय या ठिकाणी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने कोविड रुग्णालयाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण केली असून अतिरिक्त डॉक्टर आणि परिचारिका यांची नेमणूक देखील सुरू केली असल्याची माहिती सेंट्रल हॉस्पिटलचे डॉ. के रत्नाकर शेट्टी यांनी दिली. दरम्यान, भाजपाचे माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे व माजी नगरसेवक रमेश सोळसे यांनीही या रुग्णालयाला भेट देऊन उभारण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी केली. या रुग्णालयामुळे बदलापूर व लगतच्या भागातील रुग्णांची होत असलेली गैरसोय टळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले