बदलापुरात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार
बदलापूर: बदलापुरात आठवड्याभरापासून
कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बदलापुरात आतापर्यंतचे सर्वाधिक १६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बदलापुरात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ११४ वर जाऊन पोहचली आहे.
रविवारी आढळून आलेल्या १६ रुग्णांपैकी ११ रुग्ण बदलापूर पश्चिम भागात राहणारे आहेत. पश्चिम भागात एकाच इमारतीत ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ३५ वर्षीय महिला व४५ वर्षीय पुरुषासह १३ वर्षाची एक मुलगी,१० वर्षाची एक मुलगा व मुलगी तसेच ६८वर्षीय महिलेचा समावेश आहे. बदलापूर पश्चिम भागात आणखी एका १३ वर्षीय मुलीला व ३ वर्षाच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन ३१ वर्षीय पुरुष व एका ३२ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे. बदलापूर पूर्व भागात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये बेस्टच्या ३० वर्षीय सुरक्षा रक्षक व ३९ वर्षीय एचडीएफसी बँक कर्मचाऱ्यासह ३७ व ३८ वर्षांच्या दोन इसमांचा तसेच २२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. शनिवारी(ता.१६) बदलापुरात कोरोनाचे १३ तर शुक्रवारी (ता.१५) १० रुग्ण आढळून आले होते.
दरम्यान, आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे ११४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. ३४ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.