दोन दिवसीय शिबिरात २२३ बाटल्या रक्त संकलित
बदलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत बदलापुरात आयोजित दोन दिवसीय रक्तदान शिबिरात रक्तदान करून श्री सदस्यांनी २२३ बाटल्या रक्त संकलित केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा - अलिबाग यांच्या वतीने शनिवारी, रविवारी बदलापूर पूर्व येथील आदर्श महाविद्यालयात सलग दोन दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शनिवारी १०४ रक्तदात्यांनी तर रविवारी ११९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोशल डिस्टनसिंग पाळले जावे यासाठी रक्तदान करताना गर्दी होऊ नये याची उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टरांची टीम व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री सदस्यांनी केलेल्या या रक्तदानासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.