दोन दिवसांत ठाकुरवाडीत बसवणार पाण्याची टाकी
शिवसेना शहरप्रमुखांचे आश्वासन
बदलापूर: बदलापुरातील ठाकुरवाडी आदिवासी पाड्यातील नागरिकांची पाणी समस्येमुळे होत असलेली प्रचंड गैरसोय लक्षात घेता शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी याठिकाणी पाण्याची टाकी बसविण्याचे आश्वासन दिले आहे.
बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील मोहपाडा या आदिवासी वस्तीच्या बाजूला लागून असलेल्या ठाकुरवाडी आदिवासी पाड्यावरील ५५ घरांमध्ये राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नुकतेच शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी या परिसरातील नागरिकांना अन्न धान्याचे वाटप केले. यावेळी येथील महिलांनी अन्नधान्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानताना पाण्यामुळे होत असलेल्या प्रचंड गैरसोयीबाबत सांगितले. तसेच नगर परिषदेमार्फत पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.त्यावर वामन म्हात्रे यांनी येत्या एक ते दोन दिवसातच या ठिकाणी दहा हजार लिटरची पाण्याची टाकी व नळ कनेक्शन देण्याचे आश्वासन या महिलांना दिले.